वडनेर–टेंभा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालक त्रस्त

Tue 22-Sep-2026,12:03 AM IST -07:00
Beach Activities

वडनेर–टेंभा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालक त्रस्त

पावसामुळे रस्त्याची दुरवस्था आणखी गंभीर; तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

प्रतिनिधि नाज़िम खान वडनेर

वडनेर–टेंभा मार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. दररोज या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे.

पावसामुळे रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली आहे. अनेक खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली आणि अंदाज वाहनचालकांना येत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत असून, दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका वाढला आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

वडनेर–टेंभा मार्गावरून शेतकरी, विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे संबंधित विभागाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून धोकादायक खड्डे बुजवावेत. तसेच केवळ तात्पुरती डागडुजी न करता रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.