शिरसगाव - अल्लीपूर रोडवरील जीवघेण्या खड्ड्यामुळे अपघातात वाढ, तात्काळ दुरुस्तीची मागणी
तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लीपूर
हिंगणघाट तालुक्यातील शिरसगाव ते अल्लीपूर रोडवर पवनी गावाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून एक मोठा जीवघेणा खड्डा पडलेला आहे. या खड्ड्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
या एकाच खड्ड्यामुळे गेल्या ७ दिवसात ५ गंभीर अपघात झाले असून, त्यामध्ये ८ ते ९ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का, असा संतापजनक सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
या रस्त्यावरून दररोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी व नागरिक ये-जा करतात. रात्रीच्या वेळी हा खड्डा दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
जर पुढील २-३ दिवसात या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात आले नाही, तर शिवराया संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.