लोखंडी पक्कडीने मुलाला मारहाण करणाऱ्या आरोपीला ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा; २५ हजारांचा दंड
लोखंडी पक्कडीने मुलाला मारहाण करणाऱ्या आरोपीला ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा; २५ हजारांचा दंड
वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
खेळताना लोखंडी घोडीला धक्का लागल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलाला लोखंडी पक्कडीने (पेंचिस) मारहाण करून जखमी करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दोषी ठरविले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. आर. चव्हाण (हिवराळे), न्यायालय क्रमांक ९, वर्धा यांनी आरोपीला ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा आणि २५ हजार रुपये दंड सुनावला.
सुभाष देविदासजी महाकाळकर (वय ५३, रा. सोशालिस्ट चौक, वर्धा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
घटनेची पार्श्वभूमी
गांधीनगर, वर्धा येथील रहिवासी सोनाबाई राजू हराळे यांचा मुलगा सुरज व त्याचा मित्र नागेश हे हनुमान मंदिरासमोरील मैदानात श्रीमद् भागवत कथा मंडपात खेळत होते. त्यावेळी आरोपी सुभाष महाकाळकर हा मंडपाचे विद्युत सजावटीचे साहित्य काढण्याचे काम करीत होता.
खेळताना मुलांचा धक्का आरोपीच्या लोखंडी घोडीला लागला. त्यामुळे महाकाळकर याने मुलांना तेथून जाण्यास सांगितले. मात्र, मुले तेथून न गेल्याच्या रागातून आरोपीने हातातील लोखंडी पक्कडीने सुरजच्या डोळ्याजवळ आणि नाकावर मारून त्याला जखमी केले. तसेच त्याचा मित्र नागेश यालाही बुक्क्यांनी मारहाण केली.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून तसेच वैद्यकीय अहवालाच्या आधारे वर्धा शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. २५३४/२०१७, कलम ३२४ व ३२३ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाचा निकाल
या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार अर्जुन दीक्षित (ब. नं. ९४०) यांनी केला. तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद तसेच सादर करण्यात आलेले पुरावे विचारात घेत आरोपी सुभाष महाकाळकर याला कलम ३२४ भादंवि अंतर्गत दोषी ठरविले.
आरोपीला ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा आणि २५ हजार रुपये दंड सुनावण्यात आला. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
सरकारी पक्षाची बाजू
सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्रीमती डी. पी. कोठारी यांनी काम पाहिले. साक्षीदारांना न्यायालयात वेळेवर उपस्थित ठेवण्याचे तसेच पैरवीचे काम महिला पोलीस अंमलदार वर्षा अंभोरे (ब. नं. ४१०) यांनी पार पाडले.
वर्धा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांनी प्रकरणातील साक्षीदारांना न्यायालयात प्रभावीपणे साक्ष देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व ब्रीफिंग केले.