प्रलंबित मागण्यांसाठी नायरा कंपनीतील कामगारांचा २८ सप्टेंबरपासून कामबंद संपाचा इशारा
प्रलंबित मागण्यांसाठी नायरा कंपनीतील कामगारांचा २८ सप्टेंबरपासून कामबंद संपाचा इशारा
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
वर्धा | नायरा कंपनीतील कामगारांच्या वेतन, कामाचे तास, ओव्हरटाईम, वैधानिक भत्ते तसेच इतर विविध प्रलंबित मागण्यांबाबत अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नसल्याने कामगारांनी २८ सप्टेंबर २०२६ पासून शांततामय व कायदेशीर पद्धतीने कामबंद संप करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे पूर्वसूचना सादर केली आहे.
कामगारांच्या विविध न्याय्य मागण्या प्रलंबित असून, त्या पूर्ण करण्यासाठी यापूर्वी कंपनी व्यवस्थापनाकडे लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती. मात्र, आजपर्यंत मागण्यांची पूर्तता झालेली नसून कामगारांच्या समस्यांवर समाधानकारक तोडगा काढण्यात आलेला नसल्याचे कामगारांनी निवेदनात नमूद केले आहे.
प्रलंबित मागण्यांकडे कंपनी व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततामय व कायदेशीर मार्गाने कामबंद संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागण्यांवर योग्य निर्णय घेऊन त्या पूर्ण करण्याबाबत कंपनी व्यवस्थापनाने लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे.
कामगारांनी दिलेल्या पूर्वसूचनेनुसार, सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता कामबंद संप सुरू करण्यात येणार आहे. कंपनीकडून सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत संप सुरू ठेवण्यात येईल, असे कामगारांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, कामबंद संपाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखली जाईल तसेच कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्यात येईल, असेही कामगारांनी निवेदनात म्हटले आहे.
कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या प्रलंबित मागण्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर सकारात्मक तोडगा काढावा आणि मागण्या पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे