तीन प्रमुख रस्त्यांसाठी ८०० कोटींचा CRF निधी द्या

Mon 31-Aug-2026,11:14 PM IST -07:00
Beach Activities

तीन प्रमुख रस्त्यांसाठी ८०० कोटींचा CRF निधी द्यावा

खासदार अमर काळे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे मागणी; खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था, नागरिकांचा प्रवास धोकादायक

 

वर्धा प्रतिनिधि | युसूफ पठाण

 

वर्धा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या दळणवळणासाठी महत्त्वाचे असलेल्या, मात्र सध्या अत्यंत दुरवस्थेत गेलेल्या तीन प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी केंद्रीय रस्ता निधी (CRF) अंतर्गत ८०० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघातील अनेक रस्त्यांची बांधकामे व सुधारणा यापूर्वी CRF निधीतून करण्यात आली आहेत. मात्र पुलगाव–विजयगोपाल–शिरपूर, वर्धा–वायफड–रसुलाबाद–सोरटा आणि वर्धा–दिग्रस–मांडवा या तीन महत्त्वाच्या मार्गांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी या मार्गांवरील प्रवास धोकादायक ठरत आहे.

या तिन्ही मार्गांशी अनेक ग्रामीण गावे जोडलेली आहेत. शिक्षण, आरोग्य, रोजगार, व्यापार तसेच दैनंदिन गरजांसाठी ग्रामीण भागातील नागरिक या रस्त्यांचा नियमित वापर करतात. मात्र रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासासह अपघाताचा धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे.

प्रस्तावित निधीचे वितरण

वर्धा–वायफड–रसुलाबाद–सोरटा : २०० कोटी रुपये

वर्धा–दिग्रस–मांडवा : २०० कोटी रुपये

पुलगाव–विजयगोपाल–शिरपूर : ४०० कोटी रुपये

अशा प्रकारे तिन्ही प्रमुख मार्गांसाठी एकूण ८०० कोटी रुपयांचा CRF निधी मंजूर करून तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहे.

या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. नागरिकांच्या समस्येची गंभीर दखल घेत खासदार अमर काळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देऊन निधीची मागणी केली आहे.

या निधीतून तिन्ही रस्त्यांचे आवश्यक निकषांनुसार मजबुतीकरण व दुरुस्तीची कामे झाल्यास हजारो नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

“ग्रामीण भागाला शहरांशी जोडणारे हे रस्ते केवळ दळणवळणाचे मार्ग नसून विकासाची जीवनवाहिनी आहेत. त्यामुळे तिन्ही रस्त्यांसाठी मागणी केलेला ८०० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करून कामांना गती द्यावी,” अशी ठाम मागणी खासदार अमर काळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.