वर्धा तहसील कार्यालयातील महिला अधिकाऱ्यावर ३१.७७ लाखांचा धान्य घोटाळा; गुन्हा दाखल

Thu 20-Aug-2026,11:18 PM IST -07:00
Beach Activities

वर्धा तहसील कार्यालयातील महिला अधिकाऱ्यावर ३१.७७ लाखांचा धान्य घोटाळा; गुन्हा दाखल

प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा 

वर्धा, वर्धा तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात उघडकीस आलेल्या तब्बल ३१ लाख ७७ हजार ७९१ रुपयांच्या अपहार प्रकरणात वर्धा शहर पोलीस ठाण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

रेशन कार्डधारकांच्या नावे नियमबाह्य पद्धतीने धान्य मंजूर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी निरीक्षण अधिकारी मनीषा रमेश माजरखेडे आणि सेल्समन योगेश भाले यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ई-पॉस आणि लॉगिन आयडीचा गैरवापर

नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी यांनी दिलेल्या 

तक्रारीनुसार, वर्धा येथील रेशन दुकान क्रमांक २६३ (डी. बी. कुंभलवार) मध्ये ई-पॉस (e-POS) मशीन आणि लॉगिन आयडीचा गैरवापर करून गैरव्यवहार करण्यात आला. 

तपासणीत नागरिकांचे अर्ज व कोणतेही पुरावे नसताना शेकडो शिधापत्रिका (Silent RC) नियमबाह्यपणे या दुकानात वळती करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये मृत व्यक्ती, अपूर्ण पत्ता असलेले आणि 

परस्पर नाव वगळलेल्या कार्डधारकांच्या नावे धान्य मंजूर दाखवण्यात आले.

धान्य अपहाराचा तपशील

जानेवारी २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत निरीक्षण अधिकारी मनीषा माजरखेडे यांनी पदाचा गैरवापर करत:

 १४१.२० क्विंटल गहू

 ५५५.०७ क्विंटल तांदूळ

 ४६.५६ क्विंटल ज्वारी

हे धान्य बेकायदेशीरपणे मंजूर करून त्याचा अपहार केला. या धान्याची बाजारभावानुसार किंमत २६ लाख ८६ हजार ३६५ रुपये असून, इतर बेकायदेशीर वाटप व कमिशन मिळून शासनाचे एकूण ३१,७७,७९१ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

बेकायदेशीर सेल्समन नियुक्ती

वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता स्वस्त धान्य दुकानाच्या ई-पॉस मशीनवर योगेश भाले यांची नियमबाह्यपणे सेल्समन म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि दुकानाचे कमिशन त्यांच्या नावे जमा केले गेले.

अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा

तहसीलदारांच्या चौकशी अहवालानंतर व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, वर्धा शहर पोलिसांत मनीषा माजरखेडे आणि योगेश भाले यांच्यावर अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३, ७ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३३६(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

पोलीस निरीक्षक नागेश चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.