नरसिंगपूर शिवारात वाघाचा हल्ला; नागपंचमीच्या पूजेसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बळी

Mon 17-Aug-2026,09:43 PM IST -07:00
Beach Activities

नरसिंगपूर शिवारात वाघाचा हल्ला; नागपंचमीच्या पूजेसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बळी

प्रतिनिधि .युसूफ पठाण वर्धा 

(आष्टी शहीद ) परिसरातील नरसिंगपूर शिवारात नागपंचमीच्या पूजेसाठी शेतात गेलेल्या ७० वर्षीय शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्यांचा बळी घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कवठीपुरा येथील शेतकरी रामभाऊ उदेभान भोयर, वय ७० वर्षे, हे नागपंचमीनिमित्त शेतात पूजा करण्यासाठी गेले होते. पूजा सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच तळेगाव वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी गजानन लांबाडे, वनपाल रोहिणी पडोळे, वनरक्षक इंद्रपाल भगत, तसेच ठाणेदार राजेश जोशी आणि PSI हर्षल नगराळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

नरसिंगपूरसह आष्टी परिसरात वाघाच्या दहशतीमुळे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वनविभाग आणि प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू असून, शेतकऱ्यांनी शेतात जाताना विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नरसिंगपूर शिवारातील या घटनेमुळे आता वनविभाग वाघाचा बंदोबस्त कधी करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.