वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराजांचा भव्य सत्कार,३३ दांपत्यांच्या हस्ते गौरव
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत येथे ज्ञानसिंहासन काशी पीठाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'कीर्तन मार्तंड' पुरस्कार थोरला मठ, वसमतचे मठाधीश वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांना जाहीर झाल्याबद्दल ॲड. चंद्रकांत देवणे मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. रंगा महाराज मठ सभागृहात आयोजित या कार्यक्रमात ३३ दांपत्यांच्या हस्ते महाराजांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच शेकडो समाजबांधवांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी, पाद्यपूजा आणि गुरुपूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
धर्मकार्य, कीर्तन सेवा आणि समाजप्रबोधनातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ज्ञानसिंहासन काशी पीठाने वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांना 'कीर्तन मार्तंड' या लिंगायत समाजातील मानाच्या पुरस्काराने गौरविले आहे. या गौरवाबद्दल आयोजित सत्कार सोहळ्यात फटाक्यांची आतषबाजी आणि पुष्पवृष्टी करत महाराजांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज म्हणाले की, "३३ दांपत्यांच्या हस्ते झालेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत भाग्याची बाब आहे. वसमतच्या इतिहासात अशा स्वरूपाचा सन्मान प्रथमच होत असून, थोरला मठ संस्थानची गौरवशाली परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे. वसमतचे नाव उंचावेल, असे कार्य भविष्यातही सुरू राहील."
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपप्राचार्य प्रा. किशन आप्पा इमडे यांनी केले. यावेळी समाजातील ज्येष्ठ मातृशक्तींचाही विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमास समाजातील विविध स्तरांतील मान्यवर, आजी-माजी पदाधिकारी, महिला मंडळ, युवक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मित्र मंडळाचे अध्यक्ष गजानन कापूसकरी, उपाध्यक्ष सत्यनारायण नखाते, सचिव दिगंबर हुसे, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत मुटकुळे, महादेव बेले, रमेश आप्पा पत्रे तसेच मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.