आनंद सागर सिटी बनली ‘कपल पॉइंट’?; रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेतल्याची चर्चा
आनंद सागर सिटी बनली ‘कपल पॉइंट’?; रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेतल्याची चर्चा
आनंद सागर सिटी लेआउटमध्ये रात्री उशिरापर्यंत तरुण-तरुणींची वर्दळ; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वर्धा : नावेद पठाण, मुख्य संपादक । वर्धा शहरालगत असलेली आनंद सागर सिटी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मोठ्या क्षेत्रफळात पसरलेल्या या लेआउटमध्ये अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरलेले दिसून येते. या अंधाराचा गैरफायदा घेत काही तरुण-तरुणी रात्री उशिरापर्यंत निर्जन ठिकाणी थांबत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.
शहरापासून काही अंतरावर असलेल्या या परिसरात सायंकाळनंतर फिरण्याच्या बहाण्याने तरुण-तरुणी येतात आणि त्यानंतर निर्जन भागात बराच वेळ थांबत असल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी अंधाराचा फायदा घेत सार्वजनिक ठिकाणी अशोभनीय वर्तन केले जात असल्याच्या तक्रारी व आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
अंधारात नेमके काय घडते?
आनंद सागर सिटी परिसरापुरतीच ही बाब मर्यादित नसून, परिसरातील विविध नावांनी विकसित झालेल्या इतर लेआउटमध्येही रात्रीच्या वेळी अशीच परिस्थिती असल्याची चर्चा आहे. कृष्णाई सिटीला लागून असलेल्या एका लेआउटमध्येही प्रकाशव्यवस्था अपुरी असल्याने काही भाग रात्री पूर्णपणे अंधारात राहत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या अंधाराचा गैरफायदा घेत काही जण रात्री उशिरापर्यंत थांबत असल्याची चर्चा असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
या परिसरात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सायंकाळनंतर नियमित पोलिस गस्त वाढविणे, अंधारलेल्या ठिकाणांची पाहणी करणे आणि आवश्यक त्या ठिकाणी प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच आनंद सागर सिटीसह परिसरातील विविध लेआउटमध्ये रात्रीच्या वेळी नेमकी परिस्थिती काय आहे, याची संबंधित यंत्रणांनी पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?
या परिसरात एखादी अनुचित अथवा गंभीर घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने संभाव्य धोका लक्षात घेऊन वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कॅमेऱ्यात कैद झालेली ही दृश्ये प्रशासनाच्या निदर्शनास येणार का? की एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच कारवाई होणार? असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.