पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी अंत

Sat 22-Aug-2026,12:59 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर: गोंडपिंपरी धाबा पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी नियमित धावण्याचा सराव करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी २० ऑगस्ट रोजी सकाळी धाबा-सोमनपल्ली मार्गावर घडली. विठ्ठल सुधाकर मोहुर्ले (वय २८), रा. धाबा असे मृत तरुणाचे नाव आहे.

विठ्ठल हा पोलीस भरतीची तयारी करीत होता. त्यासाठी तो दररोज धाबा ते सोमनपल्ली मार्गावर धावण्याचा व व्यायामाचा सराव करीत होता. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे धावण्यासाठी घराबाहेर पडला. दरम्यान, विठ्ठल पाटील चौधरी यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अपघातानंतर विठ्ठल गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला होता. त्याच्या डोक्यासह हात-पायांना गंभीर दुखापत झाली होती. घटनास्थळाची माहिती मिळताच नातेवाईकांनी धाव घेतली. धाबा पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून त्याला ग्रामीण रुग्णालय, गोंडपिपरी येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर अज्ञात वाहनचालकाने जखमी तरुणाला कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले. मृताचा मेव्हणा आकाश आत्माराम चौधरी यांनी धाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी धाबा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा अकाली मृत्यू झाल्याने धाबा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पुढील तपास धाबा पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.