मद्यधुंद पिकअप चालकाचा बल्लारपुरात कहर मेडिकल व्यावसायिकाचा मृत्यू,चौघे जखमी

Thu 20-Aug-2026,01:13 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : रात्रीच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत भरधाव पिकअप वाहन चालविणाऱ्या चालकाने एकापाठोपाठ अनेकांना धडक देत कहर केला. या सिरीयल अपघातात मेडिकल व्यावसायिक अर्शद मुबारक खान ४८ वर्ष यांचा मृत्यू झाला, तर चौघे जखमी झाले. अपघातानंतर पळून जाणाऱ्या पिकअपने दहेली गावाजवळ ट्रकला धडक दिल्याने ट्रकची डिझेल टाकी फुटून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडले. ही घटना रात्री सुमारे ९.३० वाजता घडली.

पिकअप क्रमांक एमएच ३२ क्यू २५९५ चा चालक बालाजी लक्ष्मण कोंडे रा.

शेणगाव, ता. जिवती, जि. चंद्रपूर हा दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने गुरुनानक कॉलेजजवळ स्कूटी क्रमांक एमएच ३४ सीजी ७७८६ ला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत स्कूटीस्वार अर्शद खान गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मृतक अर्शद खान यांचे बल्लारपूर आणि बामणी येथे मेडिकल स्टोअर आहेत. रात्री बामणी येथील मेडिकल स्टोअर बंद करण्यासाठी ते आपल्या स्कूटीने जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांसह परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, अर्शद खान यांना धडक दिल्यानंतर पिकअप चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पळ काढला. बामणीच्या अगोदर त्याने एका जनावराला धडक दिली. त्यानंतर बामणी येथे आदित्य लक्ष्मण मृतुमोरी, रमेश मोहन मुंडेवाली ३५ वर्ष आणि प्रवीण संतोष ढेंगर ३१ वर्ष , तिघेही रा. भगतसिंग वॉर्ड, यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या तिघांना गंभीर दुखापत झाली.

यानंतरही पिकअप चालकाने वाहन थांबविले नाही. पुढे प्रमोद गुरुदास निब्रड २७ वर्ष रा. बामणी यांनाही पिकअपची धडक बसली. त्यात ते जखमी झाले. अखेर दहेली गावाजवळ पिकअपने ओडी १६ के ९१९९ क्रमांकाच्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रकची डिझेल टाकी फुटली आणि मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर सांडले. या अपघातात पिकअप चालक बालाजी कोंडेही जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दहेली येथे अग्निशामक दलाचे वाहन पाठविण्यात आले. अग्निशामक दलाने पाण्याचा मारा करून रस्त्यावर सांडलेले डिझेल साफ केले. त्यामुळे संभाव्य आग व मोठ्या दुर्घटनेचा धोका टळला.सर्व जखमींना प्रथम ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मृतक अर्शद मुबारक खान यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठविण्यात आला.

या थरारक सिरीयल अपघातामुळे बल्लारपूर परिसरात खळबळ उडाली असून, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अनेकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. प्रकरणाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.