अखिल भारतीय साहित्यिक संमेलनात ॲड. इब्राहिम बख्श आझाद यांचा सन्मान
अखिल भारतीय साहित्यिक संमेलनात ॲड. इब्राहिम बख्श आझाद यांचा सन्मान
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
अयोध्या : युगधारा फाउंडेशन, लखनऊ यांच्या वतीने रामलल्ला सभागृह, अयोध्या येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय साहित्यकार समागम व कवी संमेलनात महाराष्ट्रातील ज्येष्ठ अधिवक्ता व साहित्यसेवक ॲड. इब्राहिम बख्श आझाद यांचा त्यांच्या उल्लेखनीय साहित्यिक योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात मुंबईचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कृपाशंकर मिश्रा यांच्या हस्ते ॲड. इब्राहिम बख्श आझाद यांना शाल व सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. साहित्य क्षेत्रातील त्यांची सातत्यपूर्ण सेवा, सामाजिक विषयांवरील लेखन, सूत्र संचालन तसेच विविध साहित्यिक उपक्रमांमधील सक्रिय सहभागाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
ॲड. इब्राहिम बख्श आझाद हे विधी व्यवसायासोबतच साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. हिंदी, उर्दू आणि मराठी साहित्याची त्यांना विशेष आवड असून, सामाजिक, मानवी आणि समकालीन विषयांवर ते सातत्याने लेखन करीत असतात. त्यांच्या लेखनातून सामाजिक सलोखा, मानवता, बंधुभाव आणि समाजातील विविध घटकांविषयीची संवेदनशीलता प्रकर्षाने व्यक्त होते.
अयोध्येत आयोजित या साहित्यिक समागमात देशाच्या विविध भागांतून साहित्यिक, कवी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी साहित्य, संस्कृती, सामाजिक बांधिलकी तसेच भारतीय भाषांचे संवर्धन आणि साहित्याच्या माध्यमातून सामाजिक एकोपा मजबूत करण्याबाबत विचारमंथन करण्यात आले. विविध साहित्यिकांच्या काव्य व साहित्यिक सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
या प्रसंगी नागपूरचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामकृष्ण सहस्रबुद्धे, सौम्या मिश्रा, रवि शुक्ल तसेच ॲड. अब्दुल अमानी कुरैशी यांच्यासह अनेक साहित्यिक व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सन्मान स्वीकारताना ॲड. इब्राहिम बख्श आझाद यांनी युगधारा फाउंडेशन तसेच उपस्थित साहित्यिकांचे आभार मानले. साहित्य हे समाजाला जोडणारे, मानवी संवेदना जिवंत ठेवणारे आणि सामाजिक सलोखा व बंधुभाव वृद्धिंगत करणारे प्रभावी माध्यम आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. साहित्याच्या माध्यमातून सकारात्मक विचार, मानवता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्याचे कार्य यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.