शेतातील मोटारपंप चोरट्यांची टोळी सावंगी पोलिसांच्या ताब्यात

Mon 21-Sep-2026,03:12 AM IST -07:00
Beach Activities

शेतातील मोटारपंप चोरट्यांची टोळी सावंगी पोलिसांच्या ताब्यात

नावेद पठाण मुख्य संपादक, सावंगी मेघे 

सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारपंप चोरीच्या वाढत्या घटनांचा तपास करताना सावंगी पोलिसांनी मोटारपंप चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेत पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारपंप चोरीच्या अनेक घटनांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

दि. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान पडेगाव येथील शेतकरी राजेंद्र गोविंदराव डागगव्हाणे यांच्या शेतातील सिल्व्हर कंपनीची ५ एच.पी. मोटार व केबल चोरीला गेली. त्याचप्रमाणे दिलीप शामराव मसराम यांच्या शेतातील किर्लोस्कर कंपनीची ३ एच.पी. मोटार व केबल तसेच सुनील पुरुषोत्तम रेवतकर यांच्या शेतातील टरगो कंपनीची ३ एच.पी. मोटार व केबल चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली. याप्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७२४/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, मागील महिनाभरात सेलसुरा रोडवरील चंद्रकांत भैयाजी भारती यांच्या शेतातील एक मोटार, वडद रोडवरील मोरेश्वर ज्ञानेश्वर वडतकर व प्रज्वल वासुदेव डफरे यांच्या शेतातील एक मोटार तसेच नागठाणा शिवारातील स्वप्नील खुशालराव झाडे यांच्या शेतातील एक मोटार अशा चार मोटारपंप चोरीला गेल्याचे तपासात समोर आले.

मोटारपंप चोरीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक विनोद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विधिसंघर्षग्रस्त बालकाची चौकशी करण्यात आली. त्यातून त्याच्या साथीदारांच्या मदतीने शेतातील मोटारपंप चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केली.

न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर केलेल्या चौकशीत चोरी केलेले मोटारपंप सावंगी येथील राजीव नगर परिसरातील भंगार विक्रेता गोविंद गदई याला विकल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

तसेच दि. १३ ते १४ सप्टेंबरच्या रात्री सावंगी मेडिकल चौक ते सावंगी दवाखाना मार्गावरील सिमेंट रस्त्याच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राची केबल चोरी केल्याची कबुलीही आरोपींनी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७२२/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल आहे. चोरी केलेली केबल जाळून त्यातील तांबे वेगळे करून लपवून ठेवले होते. पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून ५ किलो वजनाची तांब्याची तार, किंमत सुमारे ७,५०० रुपये, जप्त केली.

तपासादरम्यान भंगार विक्रेता गोविंद गदई याच्याकडून सिल्व्हर कंपनीची ५ एच.पी. मोटार (९ हजार रुपये), किर्लोस्कर कंपनीची ३ एच.पी. मोटार (४ हजार रुपये) आणि टरगो कंपनीची ३ एच.पी. मोटार असा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारपंप चोरीच्या आणखी घटनांचा तपास लागण्याची शक्यता असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.