अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यूची सीआयडी चौकशीची मागणी

Tue 22-Sep-2026,01:51 AM IST -07:00
Beach Activities

अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यूची सीआयडी चौकशीची मागणी*

वर्धा : प्रतिनिधी इरशाद शहा

गिरड : समुद्रपूर तालुक्यातील खेक येथे अल्पवयीन शेतकरी कुटुंबातील मुलीच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण समोर आले असून, हा आत्महत्येचा प्रकार नसून कट रचून खून केल्याचा आरोप पोलीस नागरिक समन्वय समितीचे प्रधान समन्वयक प्रवीण राऊत यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राऊत यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित अल्पवयीन मुलीने तसेच तिचे वडील हरिदास सुपारे यांनी गिरड पोलीस ठाण्यात यापूर्वी तक्रारी केल्या होत्या. मात्र, तक्रारींवर वेळीच प्रभावी कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

पोलिसांनी वेळेत कार्यवाही केली असती तर मुलीचा जीव वाचला असता, असा दावा राऊत यांनी केला.

या प्रकरणात लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, बेकायदेशीर गर्भपात तसेच पूर्वनियोजित कट रचून हत्या केल्याचे आरोप निवेदनातून करण्यात आले आहेत. मात्र, या आरोपांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे.

दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित व्यक्तीने मुलीला फोन करून गावाकडे बोलावल्याचे आणि पत्नीचा दर्जा देण्याचे आमिष दाखवल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यानंतर मुलीचे वडील तिला साखरा बसस्थानक परिसरात सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास सोडून गेल्याचे नमूद आहे. त्याच दिवशी वडगाव-साखरा परिसरातील पोलीस हद्दीच्या सीमेजवळ मुलीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणाची सीआयडी किंवा गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सखोल चौकशी, संबंधित व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई, तसेच तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, तक्रार मागे घेण्यासाठी पैशांचे आमिष दाखविल्याच्या आरोपाचीही चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस नागरिक समन्वय समितीने केली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवीण राऊत यांनी केली आहे.