दुर्गुणांची होळी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सद्गुणांचा जागर

Fri 06-Mar-2026,03:14 AM IST -07:00
Beach Activities

‘दुर्गुणांची होळी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सद्गुणांचा जागर

वर्धा | प्रतिनिधी (निखिल ठाकरे)

वर्धा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारला येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या मनात चांगल्या सवयी, संस्कार आणि मूल्यांची रुजवण व्हावी या उद्देशाने ‘दुर्गुणांची होळी’ हा नाविन्यपूर्ण व संस्कारक्षम उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला.

होळी हा सण केवळ रंगांचा नसून वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारा आहे. याच संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या मनातील नकारात्मक प्रवृत्ती दूर करून सकारात्मक विचारांची बीजे पेरण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी राग, चिडचिड, मत्सर, मोठ्यांचा आदर न करणे, मोबाईलचा अतिवापर, अभ्यासात कॉपी करणे, आळस, शिस्तभंग, असत्य बोलणे, मित्रांशी भांडणे अशा विविध दुर्गुणांची यादी तयार केली. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या अंगातील एखादा दुर्गुण कागदावर लिहून तो होलिकेत अर्पण केला. “या दुर्गुणांना आज स्वाहा!” असा निर्धार करत प्रतीकात्मक होलिका दहन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि नवा उत्साह दिसून आला.

कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज पुरके, उपाध्यक्ष सीमा कंडे, सदस्य गंगाधर राऊत व नारायण खंडागळे तसेच मूल्यवर्धन तालुका समन्वयक अनमोल शंभरकर उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका नीता भांडवलकर व शिक्षिका चेतना खक्के यांनी होलिकेचे पूजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “दुर्गुणांची होळी म्हणजे केवळ कागद जाळणे नव्हे, तर मनातील वाईट विचारांचा त्याग करणे होय. आज सोडलेले दुर्गुण पुन्हा स्वीकारायचे नाहीत आणि त्याऐवजी प्रामाणिकपणा, शिस्त, परिश्रम, आदरभाव, प्रेम व सहकार्य हे सद्गुण अंगीकारायचे.”

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मपरीक्षणाची भावना जागृत झाली. स्वतःतील चुका ओळखून त्या सुधारण्याची जाणीव निर्माण झाली. उपस्थित मान्यवरांनीही या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत, अशा संस्कारक्षम उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडण्यास मोठी मदत होते, असे मत व्यक्त केले.

‘दुर्गुणांची होळी’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनावर सकारात्मक ठसा उमटवणारा ठरला असून मूल्याधारित शिक्षणाचा एक सुंदर आदर्श निर्माण करणारा ठरला आहे.