बल्लारपूरमध्ये प्रबुद्ध भारतच्या वाचक मेळाव्याचे आयोजन

Tue 03-Feb-2026,09:18 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.

बल्लारपूर:प्रबुद्ध भारत पाक्षिकाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त बल्लारपूर येथे भव्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवारी, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राजे धर्मराज मातंग समाज भवन, कलामंदिरजवळ, बल्लारपूर येथे होणार आहे.

या वाचक मेळाव्यास प्रा. अंजली प्रकाश आंबेडकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित पत्रकारितेची भूमिका, सामाजिक परिवर्तनातील माध्यमांचे महत्त्व आणि प्रबुद्ध भारतच्या वैचारिक परंपरेवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दिशा शेख राज्य प्रव्यक्ता उपस्थित राहणार आहे.

उद्घाटन नगर परिषद चे मुख्याधिकारी विशाल वाघ यांचे हस्ते होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या प्रबुद्ध भारत पाक्षिकाने गेल्या सात दशकांपासून सामाजिक समता, न्याय व विवेकवादी विचारांचा प्रसार केला आहे. या ऐतिहासिक वाटचालीच्या गौरवार्थ हा वाचक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने वाचक उपस्थित राहणार असून, नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.