बोलेरोतून प्रतिबंधित हुक्का तंबाखूची तस्करी उधळली,बल्लारपूर पोलिसांनी केला १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर:बल्लारपूर पोलिसांनी कारवा रोडवर सापळा रचून प्रतिबंधित हुक्का शिशा सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या बोलेरो वाहनावर धाड टाकत १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत २ लाख रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू आणि १० लाख रुपयांची बोलेरो जप्त करण्यात आली असून, दोन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ३१ जुलै रोजी अवैध व्यवसायांवर कारवाईसाठी पोलीस पथक परिसरात गस्त घालत असताना मुखबिरामार्फत एका काळ्या रंगाच्या बोलेरो वाहनातून शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार कारवा रोडवर नाकाबंदी करण्यात आली.
काही वेळात संशयित महिंद्रा बोलेरो क्रं. एम एच ३४ सी आर ५३४० घटनास्थळी येताच ती थांबवून तपासणी करण्यात आली. वाहनाच्या मागील बाजूस ठेवलेल्या आठ पोत्यांची पाहणी केली असता त्यामध्ये होला कंपनीच्या हुक्का शिशा सुगंधित तंबाखूचे ४०० पाऊच आढळून आले. हा प्रतिबंधित तंबाखू विक्रीसाठी साठवून वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले.
वाहनचालकाने आपले नाव सय्यद अलीम सय्यद अली २७ वर्षे, रा. लक्कडकोट, ता. राजुरा असे सांगितले. चौकशीदरम्यान त्याने हा माल सय्यद आरिफ सय्यद नूर २२ वर्ष, रा. खमाना रोड, वाकडी, जि. आसीफाबाद, तेलंगणा याच्याकडून आणल्याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी २ लाख रुपयांचा प्रतिबंधित हुक्का शिशा सुगंधित तंबाखू, १० लाख रुपयांची महिंद्रा बोलेरो असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त मालातून नमुना सीलबंद करून रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपी सय्यद अलीम सय्यद अली आणि सय्यद आरिफ सय्यद नूर या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम ३०(२)(अ), २६(२)(i), २६(२)(iv) व ५९ अन्वये बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
सदर ची कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोलीस हवालदार संतोष पंडीत, पोलीस कर्मचारी महेश कुकुडकर, मिलिंद आत्राम, फुलचंद लोधी, शांतकुमार घोसे यांनी केले.