सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ वसमतमध्ये निवेदन दोन दिवसांत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Fri 17-Jul-2026,11:10 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत देशातील प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरण अभ्यासक आणि संशोधक सोनम वांगचुक हे विविध मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे २८ जून २०२६ पासून उपोषण करत असून त्यांच्या आंदोलनाला १९ दिवस पूर्ण झाले आहेत. अद्यापही केंद्र शासनाकडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने वसमतमध्ये संतापाची भावना व्यक्त करण्यात आली.

याच पार्श्वभूमीवर आंतरभारती, शाखा-वसमत आणि संवाद समूह, वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधानांच्या नावे उपविभागीय अधिकारी, वसमत यांना निवेदन सादर करण्यात आले. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर तातडीने चर्चा करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

निवेदनात परीक्षांतील अनियमितता व पेपरफुटीच्या घटनांबाबत जबाबदारी निश्चित करण्याची, परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक व विश्वासार्ह करण्याची तसेच परीक्षांमुळे मानसिक तणावातून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी शासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून, या कालावधीत मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास वसमत तालुक्यात व्यापक आणि तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

निवेदन सादर करताना अॅड. रामचंद्र बागल, संगीता देशमुख, रेणुका डाखोरे, वैशाली भकले, शालिनी सूर्यवंशी, महादेव कापूसकरे, बाळासाहेब मलागावकर तसेच आंतरभारती व संवाद समूहाचे पदाधिकारी आणि अनेक नागरिक उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी कार्यालयाने हे निवेदन अधिकृतरीत्या स्वीकारले.