रोठा येथे १२ वर्षीय चिमुरडीवर कथित अत्याचारानंतर निर्घृण हत्या; वर्धा जिल्हा हादरला
रोठा येथे १२ वर्षीय चिमुरडीवर कथित अत्याचारानंतर निर्घृण हत्या; वर्धा जिल्हा हादरला
रोठा येथे १२ वर्षीय चिमुरडीवर कथित अत्याचारानंतर निर्घृण हत्या; वर्धा जिल्हा हादरला
( नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा )
वर्धा, वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोठा गावाजवळील शेतशिवारात बुधवारी घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. शेतातील झोपडीत एकटी असलेल्या १२ वर्षीय चिमुरडीवर कथित अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जिल्हाभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वर्धा येथील कावळे यांच्या रोठा परिसरातील शेतात पीडितेचे कुटुंब वास्तव्यास आहे. आई-वडील व दोन मोठ्या बहिणींसह पीडित मुलगी शेतातील झोपडीत राहत होती. तिन्ही बहिणी शाळेत शिक्षण घेत असून बुधवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेल्या होत्या. दरम्यान, आई-वडील दुसऱ्या शेतात कामासाठी गेले होते. पीडित मुलगी शाळेतून लवकर घरी परतल्याने ती काही काळ झोपडीत एकटीच होती.
याच संधीचा फायदा घेत अज्ञात आरोपी झोपडीत शिरल्याचा संशय आहे. आरोपीने चिमुरडीवर कथित अत्याचार केल्यानंतर गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यावर दगडाने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
कुटुंबीय घरी परतल्यानंतर मुलगी झोपडीत नग्नावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तिच्या डोक्यावर गंभीर जखमा असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच सावंगी (मेघे) पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक पथक व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित केले.
घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा तपास सावंगी (मेघे) पोलीस करीत असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.