स्टेशन फेलवरच वारंवार कारवाई; मग संपूर्ण वर्धा शहरातील अतिक्रमणांचे काय?

Thu 09-Jul-2026,10:55 PM IST -07:00
Beach Activities

स्टेशन फेलवरच वारंवार कारवाई; मग संपूर्ण वर्धा शहरातील अतिक्रमणांचे काय

प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत आहे का ?

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा । शहरातील स्टेशन फेल परिसरात पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मात्र, या कारवाईनंतर प्रशासनाच्या भूमिकेबाबत नागरिकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

गेल्या काही महिन्यांत स्टेशन फेल परिसरात तिसऱ्यांदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आल्याने, वारंवार याच परिसरात कारवाई का केली जाते, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. शहरातील इतर भागांतील अतिक्रमणांवरही अशाच प्रकारची मोहीम राबविण्यात येणार का, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कारवाईदरम्यान रस्त्याच्या एका बाजूवरील अतिक्रमण हटविण्यात आले, तर दुसऱ्या बाजूवरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी समान निकष लागू केले जात आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही नागरिकांच्या मते, अतिक्रमण हटाव मोहीम स्टेशन फेल परिसरातील विहारपर्यंतच मर्यादित राहते. त्यापुढील अतिक्रमणांवर कारवाई का होत नाही, याबाबतही चर्चा सुरू आहे. तसेच, या कारवाईवर कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा इतर दबाव आहे का, अशीही शंका काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावयाची असल्यास ती संपूर्ण वर्धा शहरात एकसमान निकषांवर आणि कोणताही भेदभाव न करता राबविण्यात यावी. गेल्या काही महिन्यांत स्टेशन फेल परिसरात तीन वेळा मोहीम राबविण्यात आली असताना, इतर भागांतील अतिक्रमणांवरही तितक्याच कठोरपणे कारवाई होणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर, कायदा सर्वांसाठी समान पद्धतीने लागू केला जाणार का, तसेच संपूर्ण शहरात व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याबाबत प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.