मौजे सिरूड येथे कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण उत्साहात संपन्न
मौजे सिरूड येथे कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण उत्साहात संपन्न
हिंगणघाट | प्रतिनिधी नाजिम खान
हिंगणघाट तालुक्यातील मौजे सिरूड येथे कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. मंडळ कृषी अधिकारी, वडनेर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सेवक अनुश्री जसुतकर यांनी या प्रशिक्षणाचे आयोजन केले. या कार्यक्रमात परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
प्रशिक्षणादरम्यान कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत मगरे यांनी तूर पिकातील बीजप्रक्रिया, आधुनिक तूर लागवड तंत्रज्ञान तसेच कापूस विकास अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानात उत्पादनवाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
मंडळ कृषी अधिकारी एन. जी. सुपारे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची माहिती देत शेतकऱ्यांना उपलब्ध लाभ व अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.
उप कृषी अधिकारी राम बावकर यांनी PMFME आणि पोकरा २.० योजनांची सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी उप कृषी अधिकारी जे. डी. येळेकर, समूह सहायक राहुल देशमुख यांच्यासह अनेक अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धनवीज (एनआरएम समन्वयक) यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकऱ्यांना प्रशिक्षण साहित्य व अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.