धावत्या रेल्वेतील प्रवाशांना लक्ष्य करणारा मोबाईल चोर जेरबंद : १४ मोबाईलसह १.९० लाखांचा मुद्देमाल जप्त
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर: धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात बसून मोबाईलचा वापर करणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करून त्यांच्या हातावर काठीने फटका मारत मोबाईल खाली पाडून चोरी करणाऱ्या एका तरुणाला रेल्वे पोलिसांनी चंद्रपूर येथे सापळा रचून अटक केली. आरोपीकडून विविध कंपन्यांचे १४ अँड्रॉइड मोबाईल अंदाजे किंमत १ लाख ९० हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. विष्णू उर्फ चुआ राजवीर केम १९ वर्ष रा. भिवकुंड वॉर्ड विसापुर आनंद नगर महाकाली कॉलरी चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.
लोहमार्ग पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ६ जुलै रोजी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास चंद्रपूर रेल्वे स्थानक ते बल्लारशाह रेल्वे स्थानकादरम्यान महाकाली कॉलरी परिसरात विशेष सापळा रचण्यात आला.
महाकाली कॉलरी नाल्याजवळील रेल्वे रुळांवर संशयास्पद हालचाली करत असताना विष्णू उर्फ चुआ राजवीर केम १९ वर्ष याला ताब्यात घेण्यात आले. आरोपी हा मूळचा बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील भिवकूंड वार्डाचा रहिवासी असून सध्या महाकाली कॉलरी येथील आनंदनगर परिसरात वास्तव्यास होता.
झडतीदरम्यान आरोपीकडून विविध कंपन्यांचे १४ अँड्रॉइड मोबाईल आढळून आले. चौकशीत आरोपीने मागील तीन ते चार महिन्यांपासून धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात मोबाईल हातात घेऊन बसलेल्या प्रवाशांच्या हातावर काठीने फटका मारून मोबाईल खाली पाडत ते चोरल्याची कबुली दिली.
या प्रकरणी रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे भारतीय न्याय संहितेच्या कलम १२४ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार जयकांत गायकवाड करीत आहेत.
सदर कारवाई लोहमार्ग नागपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. मंगेश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पंजाबराव डोळे तसेच रेल्वे पोलीस स्टेशन वर्धाचे प्रभारी अधिकारी विरसेन चहांदे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस स्टेशन वर्धाचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई अखिलेश चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे निलेश निकोडे तसेच रेल्वे सुरक्षा बल (RPF) चंद्रपूरचे उपनिरीक्षक नितीन अवसरमल व आरक्षक सुमित जांगडा यांनी संयुक्त सहभाग घेतला.
दरम्यान, रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात बसून किंवा उभे राहून मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन त स्पष्ट केले आहे