296.9 mg% अल्कोहोलच्या नशेत वाहन चालविणाऱ्या चालकावर कारवाई; वाहन जप्त
296.9 mg% अल्कोहोलच्या नशेत वाहन चालविणाऱ्या चालकावर कारवाई; वाहन जप्त
वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
वर्धा जिल्यात रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलिसांकडून विशेष वाहतूक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अतिरिक्त पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. ४ जुलै २०२६) जिल्हाभर विशेष नाकाबंदी अभियान राबविण्यात आले.
या मोहिमेदरम्यान वर्धा शहरात गस्त घालत असलेल्या वाहतूक शाखेच्या पथकाने एमएच-३२-एझेड-८६०५ क्रमांकाचे वाहन थांबवून चालकाची तपासणी केली. चालक महादेव वसंतराव नरघारे (वय ४३, रा. सदानंद मठ, सलोद हिरापूर, जि. वर्धा) हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याचे आढळून आले.
चालकाला वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात आणून ब्रीथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली. तपासणीत त्याच्या शरीरात 296.9 mg% अल्कोहोल आढळून आले. त्यानंतर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत गुन्हा नोंदवून संबंधित वाहन जप्त करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२६ मध्ये आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात मद्यप्राशन करून वाहन चालविण्याचे २४९ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच ५८ चालक परवाने निलंबित करण्याचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. हेल्मेटचा वापर न करणाऱ्या चालकांवर १२९/१७७ प्रकरणांत कारवाई करण्यात आली असून, मोटार वाहन कायद्यातील कलम ६६(१)/१९२(अ) अंतर्गत बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीच्या १०३ प्रकरणांमध्येही कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा तसेच चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्ट लावावा, असे आवाहन केले आहे. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास रस्ते अपघात टाळणे शक्य असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेने स्पष्ट केले असून, रस्ता सुरक्षेसाठी ही विशेष मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.