जलप्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे आर्वीकरांच्या आरोग्याशी खेळ?; शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर पाण्याच्या टाकीची सफाई सुरू
जलप्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे आर्वीकरांच्या आरोग्याशी खेळ?; शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर पाण्याच्या टाकीची सफाई सुरू
आर्वी (वर्धा) | प्रतिनिधी : युसूफ पठाण
आर्वी शहरात जलप्राधिकरणाच्या कथित निष्काळजीपणामुळे नागरिकांना वारंवार पाणीटंचाई, गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी तसेच अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून साथीच्या आजारांचा धोका वाढल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
शहरात उन्हाळ्यात पाणीटंचाई तर पावसाळ्यात गढूळ पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्ते, नाले आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची टीका करण्यात येत आहे.
शिवसेनेच्या वतीने 26 व 27 जूनपासून या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर 28 जून रोजी करण्यात आलेल्या पाहणीत शहराच्या पाण्याच्या टाकीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचे निदर्शनास आले. संबंधित टाकीची अनेक वर्षांपासून सफाई झालेली नसल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
या प्रकरणी जलप्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर टाकीची तातडीने सफाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार 4 जुलै रोजी पाण्याच्या टाकीतील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले.
शिवसेनेचे नगरसेवक तथा तालुकाप्रमुख योगेश (गुड्डू) गावंडे यांनी, "जोपर्यंत पाण्याची टाकी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत मी येथून जाणार नाही. स्वच्छ पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे," अशी भूमिका घेत या प्रश्नाचा पाठपुरावा केला.
दरम्यान, शिवसेनेचे विधानसभा समन्वयक सनी गौतम यांनी जलप्राधिकरणाचे उपकार्यकारी अभियंता सतीश बोरलीवार यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. यावर अधिकाऱ्यांनी शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातील (WTP) क्लॅरिफायर साफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले. दरवर्षी हे काम करावे लागते, मात्र त्यासाठी काही काळ पाणीपुरवठा बंद ठेवावा लागतो. उन्हाळ्यात ते शक्य नसल्याने आता ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, शिवसेनेने यावर प्रतिक्रिया देताना, नियमित देखभाल वेळेत झाली असती तर नागरिकांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते, असे म्हटले आहे. नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्यासाठी वारंवार आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, अशी मागणी करण्यात आली.
शहरातील पाणीपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत व स्वच्छ करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांसह तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.