बल्लारपुरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या,आजारपणाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता

Mon 06-Jul-2026,02:47 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर           

बल्लारपूर: शहरातील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या नवनिर्माण इमारत परिसरात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाने रविवारी (५ जुलै) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत तरुणाचे नाव भानुप्रताप हिरालाल यादव वय २०, रा. उसलापूर, ता. मस्तुरी, जि. बिलासपूर, छत्तीसगड असे आहे. तो आपल्या आई-वडिलांसोबत एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या नवनिर्माण इमारत परिसरातील एका खोलीत वास्तव्यास होता.

माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे ७ वाजता भानुप्रतापचे आई-वडील आणि भाऊ कामावर गेले होते. दुपारी सुमारे १ वाजता ते घरी परतले असता भानुप्रतापने खोलीत गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी तत्काळ शेजाऱ्यांना याची माहिती दिली तसेच बल्लारपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठविण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, भानुप्रताप हा उच्च मधुमेहच्या (हाय शुगर) आजाराने त्रस्त होता. त्यातून नैराश्य आल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम व पोलीस हवालदार नासीर अली सय्यद करीत आहेत.