अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर वर्धा पोलिसांचा मोठा प्रहार

Mon 06-Jul-2026,10:11 PM IST -07:00
Beach Activities

अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर वर्धा पोलिसांचा मोठा प्रहार

२.३४ लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट; २,२०० लिटर महुआ रसायन जप्त, महिला आरोपी फरार

वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण

वर्धा दि. ६ जुलै २०२६ जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारू व्यवसायाविरोधात वर्धा शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत २ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागेवरच नष्ट केला. या कारवाईत हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे तब्बल २,२०० लिटर महुआचे सडलेले रसायन जप्त करण्यात आले असून मुख्य महिला आरोपी घटनास्थळावरून फरार झाली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागेश कुमार चतारकर यांच्या नेतृत्वात वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या अवैध दारूविरोधी पथकाने ही कारवाई केली.

गुप्त माहितीच्या आधारे सोमवारी सकाळी इतवारा बाजार परिसरातील कंजर मोहल्ला येथे एका घरामागील नाल्याजवळ जमिनीत पुरून ठेवलेल्या ड्रमांवर छापा टाकण्यात आला. यावेळी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले महुआचे सडलेले रसायन आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी महिला कंचन भाट घटनास्थळावरून पसार झाली.

कारवाईदरम्यान पोलिसांनी १२ लोखंडी ड्रमांमध्ये साठवलेले १,८०० लिटर तसेच ४ प्लास्टिक ड्रमांमध्ये साठवलेले ४०० लिटर असे एकूण २,२०० लिटर महुआचे सडलेले रसायन जप्त केले. ड्रमांसह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ३४ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पंचांसमक्ष आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त केलेले रसायन व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.

या प्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात फरार आरोपी कंचन भाट हिच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ९६२/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (एफ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार सचिन भारशंकर करीत आहेत.

या कारवाईत पीएसआय शरद गायकवाड, पोलीस हवालदार सुहास चांदोरे तसेच अवैध दारूविरोधी पथकातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, जिल्ह्यात अवैध दारूची निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधातील मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा वर्धा शहर पोलिसांनी दिला.