वाघाच्या हल्ल्यात ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर :- चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. मृत व्यक्तीचे नाव राजेंद्र तिमाजी भोयर (वय ५०) असे असून, ते कामानिमित्त बरंडघाट परिसरात गेले असताना त्यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार राजेंद्र भोयर हे नेहमीप्रमाणे कामासाठी बरंडघाट परिसरात गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक झडप घालत हल्ला केला. हल्ला अत्यंत भीषण असल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काही वेळाने ही घटना निदर्शनास आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
घटनेनंतर वनविभागाने घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. वाघाच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाच्या पथकाकडून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच जंगलालगतच्या भागात गस्त वाढविण्यात येत असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेमुळे बरंडघाटसह परिसरातील गावांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. जंगलालगत शेती करणारे शेतकरी, शेतमजूर तसेच जनावरे चारण्यासाठी जंगल परिसरात जाणारे नागरिक भयभीत झाले असून, अत्यावश्यक कामाशिवाय जंगल परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी हल्लेखोर वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, वनविभागाने जंगल परिसरात नियमित गस्त वाढवावी, तसेच मृत राजेंद्र भोयर यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत व शासनाकडून नियमानुसार भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
चिमूर तालुक्यात मागील काही काळात मानव–वन्यप्राणी संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी वनविभाग आणि प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे