'झाडे लावा, झाडे जगवा, जीवन वाचवा' उपक्रमांतर्गत मातोश्री इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात वृक्षारोपण

Fri 10-Jul-2026,09:41 PM IST -07:00
Beach Activities

'झाडे लावा, झाडे जगवा, जीवन वाचवा' उपक्रमांतर्गत मातोश्री इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात वृक्षारोपण

पुलगाव | प्रतिनिधी : युसूफ पठाण

पर्यावरणाचे संवर्धन आणि निसर्गाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने 'झाडे लावा, झाडे जगवा, जीवन वाचवा' या अभियानाच्या दुसऱ्या वर्षानिमित्त मातोश्री इंग्लिश स्कूल, गुंजखेडा (पुलगाव) येथे शुक्रवारी (दि. १० जुलै २०२६) सकाळी ११ वाजता उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. हा उपक्रम डॉ. अक्षय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान शाळा परिसरातील मोकळ्या जागेत वड, पिंपळ, कडुलिंब आदी विविध प्रजातींची एकूण १५ वृक्षांची लागवड करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश देत प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.

यावेळी बसपा पुलगाव शहराध्यक्ष सोनुभाऊ मेंढे, माजी प्राचार्य आनंद जीवने, सामाजिक कार्यकर्ते हर्षपालभाऊ मेंढे, माजी मुख्याध्यापक धर्मेंद्र अंबादे, मातोश्री इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका उषा मारोती ओंकार, चंद्रकांत जोशी, माजी लिपिक प्रकाश सावसाकडे (आर. के. हायस्कूल), राजेश भंसाली व प्रफुल काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, सध्याच्या काळात वाढती वृक्षतोड आणि तापमानवाढ ही गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संगोपन करणेही प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

या उपक्रमात शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अक्षय मेंढे यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता केली.