पुलगाव–आर्वी–वारुड रेल्वे मार्गाला गती; सर्वेक्षण पूर्ण, प्रकल्पासाठी प्रारंभी २.५ कोटींचा निधी मंजूर – खासदार अमर काळे
पुलगाव–आर्वी–वारुड रेल्वे मार्गाला गती; सर्वेक्षण पूर्ण, प्रकल्पासाठी प्रारंभी २.५ कोटींचा निधी मंजूर – खासदार अमर काळे
आर्वी | प्रतिनिधी : युसूफ पठाण
पुलगाव–आर्वी–वारुड या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला अखेर गती मिळाली असून या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारने प्रकल्पासाठी प्रारंभी २.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती खासदार अमर काळे यांनी दिली.
आर्वी तालुक्यातील धाडी येथे नवनिर्मित टपाल कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी धाडी व परिसरातील विविध विकासकामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. टपाल कार्यालय हे केवळ पत्रव्यवहाराचे केंद्र नसून विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविणारे महत्त्वाचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार अमर काळे म्हणाले की, पुलगाव–आर्वी–वारुड रेल्वे मार्गासाठी त्यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला असून आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. हा रेल्वे मार्ग सर्वसामान्य प्रवाशांसह संरक्षण विभागासाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
या प्रकल्पाच्या अनुषंगाने केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मार्गाचे सामरिक महत्त्व पटवून दिल्याचेही त्यांनी सांगितले. या रेल्वे मार्गामुळे पुलगाव आणि आमला येथील दारुगोळा डेपो थेट जोडले जाणार असून दोन्ही ठिकाणांतील अंतर सुमारे १३० किलोमीटरने कमी होईल. त्यामुळे दारुगोळा व संरक्षण साहित्याची सुरक्षित आणि जलद वाहतूक शक्य होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या रेल्वे मार्गामुळे मालवाहतूक, उद्योग, व्यापार आणि स्थानिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल. भविष्यात या परिसरात नवीन उद्योग उभारणीला प्रोत्साहन मिळण्यासह आर्वी व वारुड परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची रेल्वेची मागणी पूर्ण होईल, असा विश्वास खासदार अमर काळे यांनी व्यक्त केला.