दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या बजाज प्लॅटिना चालकावर कारवाई; वाहन जप्त

Wed 15-Jul-2026,04:43 AM IST -07:00
Beach Activities

दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या बजाज प्लॅटिना चालकावर कारवाई; वाहन जप्त

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी जिल्हा पोलिसांकडून विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली 14 जुलै 2026 रोजी संपूर्ण जिल्ह्यात ब्रेथ अॅनालायझरसह विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान वर्धा शहरातील इतवार परिसरात पायदळ गस्तीदरम्यान सफौ. धीरज पांडे यांनी एमएच-32-एन-0854 क्रमांकाच्या बजाज प्लॅटिना दुचाकीची तपासणी केली. वाहनचालक दिलीप मोतीराम बावणे (वय 53, रा. जुना म्हसाळा, वर्धा) हा दारूच्या नशेत वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आले.

यानंतर वाहनचालकास वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा येथे आणून ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली. तपासणीत त्याच्या शरीरात 91.2 मिलीग्रॅम प्रति 100 मिली रक्त इतके अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले. त्यानुसार संबंधित वाहनचालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनही जप्त करण्यात आले.

दरम्यान, सन 2026 मध्ये वर्धा जिल्ह्यात दारू पिऊन वाहन चालविण्याच्या 254 कारवाया करण्यात आल्या असून 54 वाहन परवान्यांच्या निलंबनाचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तसेच हेल्मेट न वापरणाऱ्या 3,193 वाहनचालकांवर आणि अवैध प्रवासी वाहतुकीच्या 113 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे.

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना दारू पिऊन वाहन चालवू नये, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा तसेच चारचाकी चालविताना सीटबेल्ट लावावा, असे आवाहन केले आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असे पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांनी सांगितले.