सोलर प्रकल्प रखडल्याचा ग्राहकांचा आरोप; वेंडरशिप रद्द करून कारवाईची मागणी

Sat 18-Jul-2026,05:27 AM IST -07:00
Beach Activities

सोलर प्रकल्प रखडल्याचा ग्राहकांचा आरोप; वेंडरशिप रद्द करून कारवाईची मागणी

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा | वर्धा शहरालगतच्या सालोड हिरापूर परिसरातील काही ग्राहकांनी सोलर प्रकल्पाचे काम रखडल्याचा आरोप केला आहे. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, सोलर वारी कंपनीच्या प्रकल्पांतर्गत श्रीराम वेंडरशिपचे नितीन नेवल (रा. पुलगाव) यांच्या माध्यमातून सोलर पॅनल बसविण्यासाठी कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. या प्रक्रियेत सुमारे ७० ते ७५ टक्के रक्कम अदा करण्यात आल्याचे ग्राहकांनी सांगितले.

ग्राहक अंबादास अमृतकर यांनी आरोप केला की, कर्ज मंजूर होऊन चार ते पाच महिने उलटूनही सोलर पॅनल बसविण्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संबंधित ग्राहकांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याशिवाय, सालोड हिरापूर येथील ग्राहकांनी नितीन नेवल यांच्याशी अनेक वेळा दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कामाबाबत कोणतीही ठोस कार्यवाही किंवा समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी तसेच नितीन नेवल यांची श्रीराम वेंडरशिप रद्द करून योग्य ती प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संबंधित ग्राहकांनी केली आहे.