१२ वर्षीय आदिवासी मुलीच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी; महिला काँग्रेसचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
१२ वर्षीय आदिवासी मुलीच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी; महिला काँग्रेसचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
वर्धा जिल्ह्यातील १२ वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वर्धा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सौ. अरुणा प्रभाकर धोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून दोषींना तातडीने अटक करावी तसेच त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तातडीने हस्तक्षेप करून तपासावर लक्ष ठेवावे, अशीही मागणी करण्यात आली.
महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या गंभीर प्रकरणाचा कोणत्याही प्रकारच्या दबावाशिवाय निष्पक्ष तपास होणे आवश्यक असून पीडित कुटुंबाला न्याय मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. या प्रकरणात कोणतीही दिरंगाई अथवा हयगय सहन केली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
यावेळी आंदोलनादरम्यान "पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे", "दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे" तसेच "पालकमंत्री हाय हाय" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
याप्रसंगी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, धर्मपाल ताकसांडे यांच्यासह महिला काँग्रेसच्या नूतन माळवी, अश्विनी भेंडे, रोशना जामलेकर, संगीता ठवळे, स्वप्ना वानखेडे, सोनाली कोपुलवार, सपना शेंडे, शैला दीक्षित, अर्चना सोमवंशी, रोशना वाढवे, ऋतुजा भोयर, सीमा बेताल, शालू सयाम, सुरेखा कोरचे तसेच अमीषा पाटील, आतिफ सय्यद, शिवांश वडतकर यांच्यासह महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोषींवर तातडीने कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय न मिळाल्यास महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सौ. अरुणा प्रभाकर धोटे यांनी प्रशासनाला दिला.