रोठा प्रकरणात फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवा

Sat 18-Jul-2026,05:16 AM IST -07:00
Beach Activities

रोठा प्रकरणात फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवा

दोषीला फाशीची शिक्षा द्या; पीडित कुटुंबाला तातडीने मदत द्या – डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे गृह मंत्र्यांना निवेदन

हिंगणघाट, वर्धा जिल्ह्यातील रोठा (ता. सेलू) येथे १२ वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध करत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, हिंगणघाट यांच्या वतीने महाराष्ट्राचे गृह मंत्री यांना उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.

संघटनेने या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात करून दोषीला कठोरातील कठोर शिक्षा (फाशी) देण्याची मागणी केली. तसेच पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत, आवश्यक संरक्षण आणि सर्व शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.

निवेदनात संपूर्ण तपास निष्पक्ष, पारदर्शक व वेळेत पूर्ण करून कोणताही दोषी कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही, याची खात्री करण्याची मागणी करण्यात आली. राज्यातील महिला व बालिकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणीही संघटनेने केली

यावेळी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी काळे वस्त्र परिधान करून शांततापूर्ण पद्धतीने निषेध व्यक्त केला. रोठा येथील ही घटना संपूर्ण समाजाला हादरवून सोडणारी असून पीडितेला तातडीने न्याय मिळावा आणि दोषीला कठोर शिक्षा व्हावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

रोठा येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांच्यामार्फत गृह मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.