वर्धा-बल्लारशाह पॅसेंजरच्या वेळेत बदल चंद्रपूरकडे येणाऱ्यांना दिलासा मात्र विद्यार्थ्यांची गैरसोय
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : चंद्रपूर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रवाशांच्या सुविधेसाठी ट्रेन क्रमांक ६११२७ वर्धा-बल्लारशाह दैनिक मेमूच्या वेळेत बदल केला आहे. यापुढे ही गाडी वर्धा जंक्शनवरून सकाळी ६.३० ऐवजी ७.३० वाजता सुटणार आहे. सुधारित वेळापत्रकाची अंमलबजावणी ५ सप्टेंबर २०२६पासून करण्यात आली आहे.
वर्धा येथे १२२८९ मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेस सकाळी ६.५७ वाजता, तर १२१०५ मुंबई-नागपूर विदर्भ एक्स्प्रेस सकाळी ७.१२ वाजता पोहोचते. त्यानंतर ७.३० वाजता वर्धा-बल्लारशाह मेमू सुटणार असल्याने या गाड्यांनी वर्ध्यापर्यंत येऊन पुढे चंद्रपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार वर्धा जंक्शनवरून गाडी सकाळी ७.३० वाजता सुटेल. हिंगणघाट येथे ८.१७ वाजता आगमन व ८.३२ वाजता प्रस्थान, वरोरा येथे ९.१२/९.१३, माजरी जंक्शन येथे ९.२६/९.२७, तर चंद्रपूर येथे १०.२६ वाजता आगमन व १०.२८ वाजता प्रस्थान होईल. बल्लारशाह येथे गाडी सकाळी ११.०५ वाजता पोहोचेल.
या गाडीला चितोड़ा, भुगांव, सोनेगांव, वाघोली, येनोर, नागरी, चिकणी रोड, भांदक, ताडाली, छोटी पडोली, विवेकानंद नगर, बाबूपेठ, गोंडवाना-विसापूर यासह सर्व निर्धारित स्थानकांवर थांबा राहणार आहे.
विद्यार्थ्यांसह नोकरदारांची मात्र गैरसोय -
दरम्यान, वरोरा, माजरी, भांदक आदी स्थानकांवरून चंद्रपूर येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच नोकरी आणि व्यवसायानिमित्त दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही गाडी अत्यंत सोयीची होती. सकाळच्या वेळेत चंद्रपूरला पोहोचण्यासाठी अनेक विद्यार्थी व नोकरदार या गाडीवर अवलंबून होते. मात्र, आता गाडीची वेळ एक तासाने पुढे ढकलण्यात आल्याने त्यांना चंद्रपूरला उशिरा पोहोचावे लागणार आहे. त्यामुळे नियमित प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता असून, या वेळापत्रकाचा फेरविचार करण्याची मागणी होत आहे.
रेल्वे प्रशासनाने सुधारित वेळापत्रक आरक्षण व प्रवासी माहिती प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. स्थानकांवरील चौकशी कार्यालयांमध्येही नवीन वेळापत्रकाची माहिती ठळकपणे प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीच्या सुधारित वेळेची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.