हडसती–धोची मार्गाची शिवसेनेकडून पाहणी; शाळा व अंगणवाडीतील समस्यांकडेही लक्ष

Tue 21-Jul-2026,12:46 AM IST -07:00
Beach Activities

हडसती–धोची मार्गाची शिवसेनेकडून पाहणी; शाळा व अंगणवाडीतील समस्यांकडेही लक्ष

मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेल्याने वाहतूक ठप्प; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची गैरसोय

हिंगणघाट | प्रतिनिधी : मंगेश लोखंडे

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील पोहणा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत हडसती येथील हडसती–धोची मार्गाची मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, काही भाग वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरील बससेवाही बंद झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या गंभीर समस्येबाबत विद्यार्थ्यांनी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शुभांगीताई ठमेकर यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यानंतर ठमेकर यांनी संबंधित मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली.

यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शुभांगीताई ठमेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख (हिंगणघाट विधानसभा) अमित गावंडे, उपतालुकाप्रमुख वैभव ढगले, तालुका संघटक सारंग कोयाडवार तसेच अनिल ढगले, शंकरभाऊ जाधव, प्रकाश ढगले, दादाराव आत्राम, प्रमोद विरुळकर, अशोक बोरकर, मोहन देऊळकर, संघर्ष तिजारे, निखिल नांदेकर, प्रशांत दुधलकर, विशाल आत्राम यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

यानंतर शिष्टमंडळाने स्थानिक जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी शाळेत शुद्ध पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था, डिजिटल शैक्षणिक सुविधांचा अभाव तसेच इतर मूलभूत शैक्षणिक सुविधांची कमतरता असल्याचे निदर्शनास आले. याबाबत ग्रामस्थांनी विविध समस्या व तक्रारी मांडल्या.

त्यानंतर अंगणवाडीचीही पाहणी करण्यात आली. यावेळी गरोदर महिलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जाबाबत ग्रामस्थांकडून तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत शुभांगीताई ठमेकर यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य या नात्याने हडसती गावातील रस्ता, शाळा आणि अंगणवाडीशी संबंधित सर्व समस्या पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या निदर्शनास आणून देण्यात येतील. तसेच या समस्यांवर तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली जाईल, अशी ग्वाही शुभांगीताई ठमेकर यांनी ग्रामस्थांना दिली.