वर्ध्यात वाहनचोर जेरबंद; १.९५ लाख रुपयांची पाच वाहने जप्त
वर्ध्यात वाहनचोर जेरबंद; १.९५ लाख रुपयांची पाच वाहने जप्त
वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी – युसुफ पठाण
वर्धा शहर परिसरात मोटारसायकल चोरी प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले असून एका वाहनचोराला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून सुमारे १ लाख ९५ हजार रुपयांची पाच वाहने जप्त करण्यात आली आहेत.
३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते १०.३० वाजताच्या सुमारास शिवाजी चौक ते गोंड प्लॉट मार्गावरून फिर्यादी किशोर तुलसीदास वाघेला (रा. गजानन नगर) यांची हिरो कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल (क्र. MH-32-AR-9088) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी वर्धा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २६ फेब्रुवारी २०२६ रोजी संत ज्ञानेश्वर नगर येथील अमोल अशोकराव पांडे (वय ३९ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या ताब्यातून एकूण पाच वाहने जप्त करण्यात आली असून त्यांची अंदाजे किंमत १ लाख ९५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये चोरीस गेलेली हिरो मोटारसायकल तसेच स्प्लेंडर प्लस, हिरो एचएफ डिलक्स, होंडा डिओ आणि होंडा अॅक्टिवा या वाहनांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.