हिंगणघाट पोलिसांची कारवाई; एमडी ड्रग्ससह एक आरोपी अटकेत, दुचाकीसह ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट पोलिसांची कारवाई; एमडी ड्रग्ससह एक आरोपी अटकेत, दुचाकीसह ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट : अब्दुल कदीर बख्श
हिंगणघाट पोलिसांनी रात्रगस्तीदरम्यान धडक कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) या मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या अंमली पदार्थासह एका आरोपीला अटक केली. आरोपीकडून दुचाकीसह एकूण ८३ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि दीपक वानखेडे, पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे व अन्य कर्मचारी रात्रगस्त पेट्रोलिंग करत असताना मुखबिराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की संत कबीर वॉर्ड, हिंगणघाट येथील गुड्डू सूर्यवंशी हा इसम मोटारसायकलवरून मेफेड्रोन हा मनोव्यापारावर परिणाम करणारा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने संत कबीर वॉर्ड येथून राम मंदिर रोडमार्गे हिंगणघाटकडे येत आहे.
ही माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक तसेच पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांना कळवून त्यांच्या आदेशानुसार राम मंदिर रोड येथे सापळा रचून नाकेबंदी केली. दरम्यान संशयित इसमाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव गुड्डू महेश सूर्यवंशी (वय ३१ वर्ष), रा. संत कबीर वॉर्ड, हिंगणघाट जि. वर्धा असे सांगितले.
पंचासमक्ष आरोपीची कायदेशीर झडती घेतली असता त्याच्याकडून एका प्लास्टिकच्या पिशवीत मेफेड्रोन हा मनोव्यापारावर परिणाम करणारा अंमली पदार्थ आढळून आला. प्लास्टिक पिशवीसह त्याचे एकूण वजन ५.६८ ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत १३ हजार रुपये आहे. तसेच आरोपीकडून बजाज कंपनीची पल्सर १५० मोटारसायकल (क्र. एमएच ३१ एएफ ३९८१) किंमत अंदाजे ७० हजार रुपये व नगदी ४४० रुपये असा एकूण ८३ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा क्रमांक ३४३/२६ कलम ८(क), २१(बी) तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत कलम १३०/१७७, १८१, ३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दीपक वानखेडे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे, पो.शि. मंगेश वाघमारे, पोशी रोहित साठे यांनी केली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे इन्चार्ज सपोनि पद्माकर मुंडे, पोलीस स्टेशन हिंगणघाट हे करीत आहेत.