दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकावर कारवाई; ऑटो जप्त

Sun 08-Mar-2026,04:16 AM IST -07:00
Beach Activities

दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकावर कारवाई; ऑटो जप्त

वर्धा,  जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसूफ पठाण

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार वर्धा शहरात वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात विशेष कारवाई करण्यात आली.

दि. ०७ मार्च २०२६ रोजी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय भांडेकर (बी.सी. १०१२) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल तिवारी (बी.सी. ४४३), पोलीस शिपाई दिलीप कामडी (बी.सी. १६३) व पोलीस हवालदार मुकेश राऊत (बी.के. १२६५) हे औसे बसस्टँडसमोरील रस्त्यावर पेट्रोलिंग व वाहन तपासणी करत होते.

दरम्यान एमएच ३१ सीक्यू ८७७१ क्रमांकाचा ऑटो चालक निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालविताना आढळला. पोलिसांनी वाहन थांबवून चालकाची चौकशी केली असता प्रलय मुकेश सखारे (वय ४२, रा. हवालदारपुरा, वर्धा) हा चालक दारूच्या नशेत असल्याचा संशय आला.

यानंतर त्याला वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा येथे आणून ब्रेथ अॅनालायझर चाचणी करण्यात आली. तपासणीमध्ये त्याच्या शरीरात ३८ एमएल अल्कोहोल आढळून आले. त्यानुसार संबंधित चालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून संबंधित ऑटो (एमएच ३१ सीक्यू ८७७१) जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दारू पिऊन वाहन चालवू नये तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा अशा चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.