सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात आसिफ खान यांचे “कफन-दफन” प्रतिकात्मक आंदोलन

नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा:वर्धा, दि. 24 ऑक्टोबर (शुक्रवार) वर्धा शहरातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलावरील खोल खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. प्रशासन मात्र झोपेत असून, जनतेच्या सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा भोंगळ, निष्क्रिय आणि बेजबाबदार कारभार आता जनतेच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे.
ए.आय.एम.आय.एम. चे शहराध्यक्ष आसिफ खान यांनी वारंवार निवेदन देऊन आणि पाठपुरावा करून संबंधित विभागाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, भ्रष्टाचारात गढलेली आणि संवेदनशून्य यंत्रणा यावर कोणतीही कारवाई करण्यास असमर्थ ठरली.
याच निष्क्रिय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आसिफ खान यांनी “कफन-दफन” हे तीव्र प्रतिकात्मक आंदोलन करून जनतेच्या आक्रोशाचा जाहीर उद्रेक केला.
या आंदोलनादरम्यान त्यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत म्हटले की,
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेचं गढ! जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांचा आता सार्वजनिकपणे अंत पाहिलाच पाहिजे. हा ‘कफन-दफन’ आंदोलन केवळ प्रतीक नाही, तर जनतेच्या सहनशीलतेचा शेवट आहे.
खान पुढे म्हणाले की, जर या प्रतिकात्मक आंदोलनानंतरही प्रशासनाने जाग न घेतली, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र आणि आक्रमक पद्धतीने करण्यात येईल. या आंदोलनादरम्यान अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समर्थन दर्शविले.