स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये नाराजी; सक्ती थांबवण्याची मागणी
स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये नाराजी; सक्ती थांबवण्याची मागणी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उपविभागीय अभियंत्यांना निवेदन
हिंगणघाट | निखिल ठाकरे
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आले.
सध्या महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असून, या निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर रिडिंग व युनिट संदर्भातील विविध समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून प्राप्त होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अनेक ग्राहकांना त्यांच्या नियमित वापरापेक्षा अधिक वीज युनिट दाखविले जात असल्याची भावना असून, त्यामुळे वीज बिलांमध्ये अनपेक्षित वाढ होत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय तांत्रिक बिघाड, नेटवर्क समस्या तसेच मीटरच्या अचूकतेबाबतही नागरिकांमध्ये शंका निर्माण झाल्या आहेत.
या सर्व तक्रारींचे निराकरण होऊन स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांचा पूर्ण विश्वास निर्माण होईपर्यंत हिंगणघाट शहरातील ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात वीज कायद्यातील कलम ४७(५) चा उल्लेख करण्यात आला असून, ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना विद्यमान वीज मीटर कायम ठेवण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
नागरिकांच्या भावना व अडचणी लक्षात घेऊन हिंगणघाट शहरात स्मार्ट मीटरची सक्ती थांबवून यासंदर्भात योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, नितीन भुते, जिल्हा सचिव राजू मुडे, जिल्हा सहसचिव शेखर ठाकरे, विधानसभा अध्यक्ष हुकेश ढोकपांडे, अब्रार फारुकी, मोहम्मद शाहिद, तालुका संघटक पंकज भट्ट, सुरेंद्र मुळे, अमर धनविज, योगेश देशमुख, कुणाल गोल्हर, निलेश आवारी, निखिल ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीपूर्वी नागरिकांच्या शंका व तक्रारींचे निराकरण करून त्यांचा विश्वास संपादन करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.