रा.सु.बिडकर महाविद्यालय हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी हिंगणघाट येथील रा.सु. बिडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वर्धा आणि रा.सु. बिडकर महाविद्यालय, हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन आमदार समीर कुणावर यांचे हस्ते करण्यात आले .
या मेळाव्याच्या माध्यमातून विविध कंपन्या, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी व युवक-युवती यांची थेट भेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगार युवकांना त्यांच्या कौशल्यांनुसार नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.
रोजगार मेळाव्यात स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावरील विविध कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. उत्पादन, सेवा, आयटी, विक्री-वितरण, बँकिंग, विमा, औद्योगिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये शेकडो पदांसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. यामुळे अनेक पात्र उमेदवारांना थेट रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, स्थानिक मान्यवर, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व रोजगार शोधणारे युवक-युवती उपस्थित होते.