अश्लील धमाका व डान्स हंगामाच्या आयोजनावर भजेपार ग्रामसभेची कायमची बंदी

Tue 02-Sep-2025,01:03 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा

"एक गाव एक उत्सव" सारखे अनेक महत्त्वपूर्ण ठराव ग्रामसभेत पारित

सालेकसा -महापुरुषांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या आणि शासनाच्या अनेक पुरस्कारांनी नावारूपास आलेल्या भजेपार ग्रामसभेने नुकतेच अनेक क्रांतिकारी ठराव सर्वानुमते पारित करून संस्कारी ग्रामविकासाचा नवा अध्याय सुरू केला आहे. गावात परप्रांतीय,अश्लील धमाका, डान्स हंगामा आणि यासारख्या अश्लीलतेला प्रोत्साहित करणाऱ्या तत्सम कार्यक्रमांसाठी ग्रामपंचायत तर्फे नाहरकत प्रमाणपत्र न देण्याचा तथा अशा आयोजनांवर कायमची बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आला असून विशेषतः महिला वर्गाने या निर्णयाचे भरभरून स्वागत केले आहे. जिल्ह्यात दिवाळी नंतर साधारणतः महिनाभर गावागावात मंडई आणि शंकर पट आयोजनाची धूम सुरू होते. दरम्यान झाडीपट्टीची नाटके, दंडार, लावणी, नवटंकी ड्रामा, झाकी अशा पारंपारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची झाडीपट्टीची जुनी परंपरा आहे. परंतु मागील काही वर्षात धमाका, डान्स हंगामा यासारखे संस्कृतीमारक परप्रांतीय कार्यक्रम वाढल्याने झाडीपट्टीची लोककला लोप पावत चालली असून अशा आयोजनांमुळे समाजात अश्लीलतेला प्रोत्साहन मिळते, अराजकता निर्माण होते, भांडणतंटे वाढतात, चिमुकल्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो, शिस्तीला गालबोट लागल्यास गावाची बदनामीही होते त्यामुळे समाजाला दिशाहीन करणाऱ्या अशा कार्यक्रमांना गावात कायमची बंदी घालण्यात आली असून जिल्ह्यातील गावागावात अशा निर्णयांची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. 

गावकऱ्यांनी एकदिलाने घेतलेले निर्णय आगामी काळात भजेपारच्या प्रगतीला नवी दिशा देणारे ठरणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.विशेष म्हणजे सामाजिक एकता, बंधुता व खर्चात बचत यासाठी गावकऱ्यांनी “एक गाव – एक उत्सव” ही संकल्पना ग्रामसभेत पारित केली असून गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, मंडई, यात्रा असे कोणतेही उत्सव गावकरी मिळून एकाच ठिकाणी एकत्रितपणे साजरे करतील. कोणत्याही परिस्थितीत गावात एक उत्सव अनेक ठिकाणी साजरा करता येणार नाही. सर्वांना आयोजनाची समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळ्या मोहल्ल्यांना उत्सवातील कार्यक्रमांची वाटणी करून तो उत्सव एखाद्या वार्डाचा किंवा मोहल्याचा न राहता संपूर्ण गावाचा उत्सव कसा ठरेल यासाठी प्रयत्न केले जातील. या निर्णयाने गावात ऐक्य वृद्धिंगत होईल, समाजात सौहार्द टिकेल व अनावश्यक खर्च टळेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. रस्त्यावर जनावरे बांधण्यास बंदी

गावातील प्रमुख रस्ते, मंदिर परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधणे, बैलगाड्या व लाकडे ठेवण्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, तसेच रस्त्यांवर घाण व अस्वच्छता पसरते. शाळेची बस, रुग्णवाहिका, दूधगाडी, गॅस गाडी व अग्निशमन वाहनांना या अडथळ्यामुळे अडचणी येत असल्याच्या तक्रारी ग्रामसभेत नोंदविण्यात आल्या. यावर उपाय म्हणून २ ऑक्टोबर गांधी जयंतीपासून अशा प्रकारावर कायमची बंदी घालण्यात येणार आहे. नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा ठराव पारित करण्यात आला आहे. धान खरेदीत गावकऱ्यांना प्राधान्य

भजेपार गावाच्या नावाने नोंदणीकृत धान खरेदी संस्थेत इतर गावातील शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यापूर्वी भजेपारच्या शेतकऱ्यांचे धान प्रथम खरेदी करण्यात यावे, शक्य झाल्यास गावातच खरेदी करण्यात यावी असा ठराव देखील मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे गावातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल, त्यांचे आर्थिक नुकसान टळेल आणि न्याय मिळेल.