वर्धा-हिंगणघाट मार्गावर भीषण अपघात बस ची ट्रेलर ला जोरदार धडक

Sun 27-Jul-2025,06:02 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लीपुर 

वर्धा-हिंगणघाट मुख्य मार्गावर धोत्रा येथील पेट्रोलपंपजवळ शुक्रवारी सकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. एसटी बस आणि भरधाव वेगाने येणाऱ्या १६ चाकी ट्रेलर यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत एसटी बसचा चालक गंभीर जखमी झाला असून वाहकासह सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात एसटी बसचे प्रचंड नुकसान झाले आहे.ही एसटी बस आकोट येथून वर्धा मार्गे हिंगणघाटकडे परत येत होती. बस क्रमांक एमएच ४० - सीएम ३१९० ने एकूण २५ प्रवाशांना घेऊन प्रवास सुरू केला होता. बस धोत्रा गावाजवळील पेट्रोलपंपाजवळ आली असताना, एक १६ चाकी ट्रेलर डिझेल भरून भरधाव वेगात रस्त्यावर निघाला. ट्रेलर चालकाचे लक्ष नसल्याने त्याने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली.अपघात इतका जबरदस्त होता की, बसचा समोरील भाग अक्षरशः चकनाचूर झाला.बसचा चालक गंभीररीत्या जखमी झाला असून, त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाहकासह इतर सात प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांनाही उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच अल्लीपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घुले, पोलीस कर्मचारी व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मदतकार्यात सहभागी होत जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात पाठवले.या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. क्रेनच्या मदतीने दोन्ही वाहने बाजूला करण्यात आली. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.