विदर्भ खैरे कुणबी समाजाच्या वतीने प्रशांत वाघरे यांना "समाजभूषण पुरस्काराने" सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी --विभा बोबाटे गडचिरोली
देसाईगंज:- विदर्भ खैरे कुणबी समाज संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त, नागपूर येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या खैरे कुणबी समाजाच्या महाअधिवेशनात ओबीसी नेते, प्रभावी वक्ते आणि कुणबी समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्व प्रशांत वाघरे यांना "समाजभूषण पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले.हा भव्य सोहळा स्वर्गीय विमलताई देशमुख सभागृह, धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर येथे संपन्न झाला.पुरस्कार स्वीकारताना आणि उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रशांत वाघरे म्हणाले,"हा पुरस्कार माझ्यासाठी नव्हे, तर गडचिरोली जिल्ह्यातील समस्त कुणबी समाज बांधवांचा आहे. समाजाने दाखवलेला सन्मान ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे, आणि हा विश्वास कायम राखण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन."ते पुढे म्हणाले, "समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तरसमाजात एकता आणि समभाव राखणं अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा विरोध न करता, सर्व पक्षांना सोबत घेऊन एकत्र वाटचाल केली, तर आपल्या समाजाचा विकास निश्चित साधता येईल. समाजकार्य करताना ज्येष्ठ नागरिक आणि आदर्श व्यक्तिमत्त्व असलेल्या नेतृत्त्वाचा आदर्श घेऊनच काम करायला हवं. समाजाला नवी दिशा देण्याचं काम आपल्यालाच करावं लागेल."यानंतर त्यांनी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना संबोधित करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले."आजच्या या मंचावर उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने समाजाचा अभिमान वाढवला आहे. शिक्षण हेच आपलं खऱ्या अर्थाने भांडवल आहे, आणि या विद्यार्थ्यांनी समाजासाठी आदर्श ठरावं, हीच अपेक्षा आहे," असे ते म्हणाले.या सोहळ्याला मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक भाऊसाहेब थुट्टे राष्ट्रीय प्रबोधनकार व सप्त खंजिरी वाधक वर्धा, अशोक शिंदे माजी वस्त्रोद्योग मंत्री म. रा., प्रा.ज्ञानेश्वर वाकुडकर सुप्रसिद्ध कवी, डॉ.विजय देवतळे अध्यक्ष खै.कु.स.चंद्रपूर, ऋषभ राऊत प्रवक्ता राष्ट्रीय ओबीसी महासंघ, शेषराव येलेकर उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ, श्याम लेडे, भैय्या पोंगडे, विजय वाकुलकर, डॉ. राजेश ठाकरे, बाबाराव उंबरकर, वृंदा ठाकरे, देवाजी भुजाडे, हिना देशमुख, एड.दिगंबर गुरपुडे, मोहन डंगारे, एड. स्वप्निल मोंडे, एड. गिरीश बोबाटे, तसेच ज्येष्ठ समाजसेवक व कुणबी समाज बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.