मनपा शाळांना सीसीटीव्ही सुरक्षेचे कवच २४ शाळांमध्ये बसविले २५६ कॅमेरे

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका शाळांमधील बालसुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेने आता शाळांना सीसीटीव्हीचे सुरक्षा कवच दिले असुन २४ शाळांमध्ये एकुण २५६ सीसीटीव्ही कॅमेरे विद्युत विभागामार्फत बसविण्यात आले आहेत.चंद्रपूर महानगरपालिकेच्या एकुण २६ शाळा आहेत. या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आयुक्त व प्रशासक विपीन पालीवाल यांनी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता महापालिकांच्या २६ पैकी २४ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षित आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने बसविले गेले असुन उर्वरीत २ शाळांमध्ये लवकरच बसविले जाणार आहेत.बदलापूर येथील शाळेत घडलेल्या प्रकारानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तसेच शाळेत सीसीटीव्हींचे जाळे नसल्याचा मुद्दा देखील चर्चेला आला होता. महापालिकेच्या २१ इमारतींमध्ये २४ प्राथमिक आणि २ माध्यमिक अशा एकूण २६ शाळा असून त्याठिकाणी ४३३३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यानुसार आता या विद्यार्थ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच ठेवला जाणार आहे.शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत चुकीच्या घटना घडु नये याकरीता राज्य सरकारने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेने महत्त्वाची पावले उचलली आहेत व या कॅमेऱ्यांचे नियंत्रण हे शाळेतील मुख्याध्यापकांच्या ताब्यात ठेवले आहे.याठिकाणी बसविले गेले आहेत कॅमेरे शाळांच्या येण्या जाण्याच्या प्रवेशद्वाराजवळच, वर्गखोलीत तसेच शौचालयाच्या परिसरात बाहेरील ठिकाणी,मैदान,वंराडा,पॅसेज,जिन्यावर याशिवाय इतर महत्वांच्या ठिकाणी कॅमेरे बसविले गेले असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.