हट्टा जवळ भीषण अपघात एक जण ठार पाच जखमी

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत तालुक्या हट्टा मार्गावर गुंडा पाटीजवळ भरधाव क्रूझर जीप दुचाकीला धडकून झाडावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ता. २३ दुपारी घडली आहे. जखमींना परभणी येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील काही वारकरी आज दुपारच्या सुमारास क्रूझर जीपने पंढरपूरकडे निघाले होते. त्यांची जीप औंढा नागनाथ ते हट्टा मार्गावर आली असतांना समोर धावणाऱ्या दुचाकीला जीपने धडक दिली. या अपघातानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन जीप थेट रस्त्याच्या खाली असलेल्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली.या अपघातात दुचाकीवरील विठ्ठल सावंत (३७, रा. बोरीसावंत) यांचा मृत्यू झाला. तर जीप झाडावर आदळल्यामुळे जीप चालक भागवत घोंगडे यांच्यासह जीपमधील सुभाष शेळके, प्रमोद कऱ्हाळे, ज्ञानबा कऱ्हाळे, बंडू शेळके हे गंभीर जखमी जाले. या अपघाताची माहिती मिळताच हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षकसंग्राम जाधव, जमादार प्रफुल्ल आडे, हिरामण चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने जीपमधे अडकलेल्या भाविकांना बाहेर काढून उपचारासाठी परभणी येथे रवाना केले आहे.दरम्यान, या अपघातातील मयत विठ्ठल सावंत यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला आहे. मयत विठ्ठल हे बाराशिव येथील एका इंग्रजी शाळेवर शिक्षक म्हणून काम करतात. शाळा सुटल्यानंतर ते दुचाकी वाहनाने बाराशिव येथून बोरीसावंत येथे गावाकडे निघाले होते. यावेळी हा अपघात झाला. या घटनेमुळे बोरीसावंत गावावर शोककळा पसरली आहे.