शाळा, ग्रामपंचायत पाण्याखाली; यशोदा नदीने घेतला रौद्ररूप

Wed 09-Jul-2025,12:00 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी - सुनिल हिंगे, अल्लीपूर

हिंगणघाट तालुक्यातील यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून, यशोदा नदीचे पाणी थेट पुलावरून वाहू लागले आहे.

यामुळे अल्लीपूर ते अलमडोह, टाकळी दरणे, तसेच वायगाव ते राळेगाव हे मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत. या मार्गावरून होणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून, नागरिकांना ये-जा करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

पुराच्या पाण्यामुळे अलमडोह गावातील ग्रामपंचायत कार्यालय व शाळेपर्यंत पाणी पोहोचले असून, शेजारील शेतांमध्येही पाणी शिरले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे व संभाव्य धोका लक्षात घेता काही ठिकाणी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.