सरन्यायाधीशांवरील भ्याड हल्ल्याचा कारंज्यात विविध सामाजिक संघटनांकडून तीव्र निषेध

नावेद पठाण मुख्य संपादक
कारंजा (घा.) : नुकत्याच घडलेल्या सरन्यायाधीशांवरील भ्याड हल्ल्याचा कारंजा शहरातील विविध सामाजिक संघटनांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या संदर्भात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
संघटनांच्या प्रतिनिधींनी म्हटले की, “हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर आपल्या लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर, न्यायसंस्थेच्या स्वातंत्र्यावर आणि कायद्याच्या राज्यावर आहे.”
अशा प्रकारच्या घटनांमुळे न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास डळमळीत होण्याचा धोका निर्माण होतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
न्यायव्यवस्था ही कोणत्याही लोकशाही राष्ट्राची चौथी स्तंभ मानली जाते आणि सरन्यायाधीश हे त्या व्यवस्थेचे सर्वोच्च प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला होणे म्हणजे संपूर्ण न्यायसंस्थेच्या मूलभूत रचनेवर आघात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
संघटनांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, न्यायाधीशांच्या सुरक्षेबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठोस कृती तात्काळ करावी, अशी मागणी केली आहे.
तहसीलदार डॉ. हंसा मोहने यांनी हे निवेदन स्वीकारले. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनाच्या प्रतिलिपी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनाही पाठविण्यात आल्या.
या वेळी कारंजा नागरी समस्या संघर्ष समिती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, गुरुदेव सेवा मंडळ, बुद्धिस्ट एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन, राष्ट्रीय मुस्लिम सेवा संघ, अवतार मेहेर बाबा आध्यात्मिक केंद्र, भारतीय बौद्ध महासभा, कारंजा तालुका काँग्रेस कमिटी आदी संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.