कोरची तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
सरसकट एकरी 50 हजार आर्थिक मदत द्या काँग्रेस कमिटीची निवेदनातून मागणी
कोरची :- मागील चार महिन्यापासून आपल्या शेतावर आपल्या संपूर्ण आयुष्याची कमाई लावून राब राब राबणारा शेतकरी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे आता हवालदिल झाला असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून कोरची तालुक्यात सतत येत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची हातावर पोट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
कोरची तालुक्यातील मुख्य उत्पादनाचे साधन हे भाताची शेती असून तालुक्यातील शेतकऱ्यांना कुठलाही जोडधंदा नसल्यामुळे आता शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी येऊन ठेपलेली आहे. काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची गरज नसताना सतत येणाऱ्या पावसामुळे तुडतुडा, करपा सारखे रोग धान्य पिकाला लागले होते ज्यामुळे यावर्षी उत्पन्न किती होईल? ही सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंता होती. परंतु काल आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक आडवे झाले आहेत.
तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांचे धान आता सडण्याच्या मार्गावर असून आता आपले व परिवाराचे उदरनिर्वाह करावे तरी कसे असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे. त्यामुळे कोरची तालुक्यात तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी 50000 रु आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्ष कोरचीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी निवेदन देताना काँग्रेस पक्ष कोरची चे तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल,जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रामसुराम काटेंगे,नगराध्यक्ष हर्षलताताई भैसारे,महिला काँग्रेस अध्यक्ष प्रेमिला काटेंगे,माजी सभापती श्रावण मातलाम,नगरसेवक धनराज मडावी,नगरसेवक धरमसाय नैताम, मेहेरसिंग काटेंगे,जगदीश काटेंगे,विठ्ठल शेंडे,गोपाल मोहुर्ले, सुरेश उइके, नत्थुलाल उईके, बुधराम फुलकवर,निर्मल मडावी तसेच अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.