वर्धा जिल्ह्यातील रेतीघाट निर्धारित वेळेत सुरू करण्याबाबत निखिल सातपुते यांच्या नेतृत्वात निवेदन सादर

नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा :गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यातील रेतीघाट एप्रिल–मे महिन्यात सुरू करून जून महिन्यात बंद केले जातात. त्यामुळे कृत्रिमरीत्या रेतीचा तुटवडा निर्माण होतो. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यातील विविध नदी–नाल्यांतून दिवस–रात्र अवैध रेती उपसा सुरू असल्याने सामान्य नागरिकांना निकृष्ट दर्जाची रेती अवाजवी दराने खरेदी करावी लागत आहे.
सामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराची जमापुंजी घर बांधण्यासाठी खर्च करतो. पण मातीमिश्रित, निकृष्ट गुणवत्तेची रेती दुप्पट भावाने घ्यावी लागत असल्याने घरबांधणीचे बजेट तब्बल दोन ते तीन लाख रुपयांनी वाढले आहे.
गेल्या चार–पाच वर्षांपासून रेतीघाटांचे लिलाव प्रशासनातील लालफितशाहीमुळे विलंबित होत आहेत. शासनाच्या स्पष्ट वेळापत्रकानुसार प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने जिल्ह्यातील ट्रक चालक–मालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा ट्रक चालक-मालक संघटनेतर्फे निखिल सातपुते आणि अविनाश काकडे यांच्या नेतृत्वात उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. शासन परिपत्रक क्रमांक गौ. खनि. 10/01/25 प्र. क्र. 05/ख-1 नुसार रेतीघाट लिलाव प्रक्रियेबाबत आजअखेर प्रशासनाने किती प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत, याची माहिती देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली.
निवेदनात असा इशारा देण्यात आला की, “रेतीघाट लिलाव प्रक्रियेत कोणतीही दप्तरदिरंगाई आढळल्यास जय महाराष्ट्र युवा संघटनेतर्फे निखिल सातपुते यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडले जाईल. या आंदोलनात ट्रक मालक, लोखंड–सिमेंट विक्रेते, कामगार, आर्किटेक्ट आणि इंजिनिअर यांचा सक्रिय सहभाग असेल.”
या प्रसंगी दिलीप नाईक, विपीन पांडे, अमोल रामटेके, कृष्णा नांदुरकर, कपिल नाईक, गोलू जगताप, गौरव पाटील, मंगेश भोंगाडे, अमर बेलगे, राजेश वरघणे, कन्हैया यादव, सचिन मेश्राम, विकी थोरात, भूषण सुरकार, अक्षय बुरांडे, राकेश भुतकर, प्रशांत उमरे, एजाज कुरेशी, प्रशांत नेहारे, देवा अरगुडे, श्रुतीक बोरकर, विशाल चौधरी, अमित झोड, निलेश कळंबे, प्रमोद उमाटे, अतुल मोटघरे, अंकित झांबरे, स्वप्नील नारसे, धीरज चव्हाण, यशोधन देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.